Pune : पुण्यात पार्किंगच्या नावाखाली खंडणी ! बंडू आंदेकर याच्यासह दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्काच्या कारवाई केलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिकृत पार्किंग नसतानाही खोटे पावती पुस्तक छापून पार्किंगच्या नावाखाली हजारो रुपये खंडणी स्वरूपात वसूल केल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणला आहे. नाना पेठेत त्यांनी ही पार्किंगची खंडणी उकळली आहे.

याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडु आंदेकर (रा. नाना पेठ, पुणे) व सागर थोपटे (नाना पेठ, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव सिद्धू सारवाड (वय 24, रा. संभाजीनगर धनकवडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेत असलेल्या अल्पना टॉकीज जवळ नागझरी भिंतीलगत बंडू आंदेकर व सागर थोपटे यांनी बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा या नावाने अनधिकृत वाहनतळ उभारले आहे. तसेच त्यांनी खोटे पावती पुस्तक छापले होते. येथे त्यांनी दुचाकीला पार्क करण्यासाठी 10 रुपये घेऊन पावती देत असे. फिर्यादी यांच्याकडून देखील त्यांनी दुचाकी पार्किंगच्या नावाखाली दमदाटी करून दोन वेळा प्रत्येकी 10 रुपये वसूल केले. त्यासोबतच याठिकाणी दररोज 350 ते 400 रिक्षा व दुचाकी गाड्या पार्क होतात. या वाहनचालकांना फसवून व धमकावून त्यांच्याकडून दररोज साडेतीन हजार ते चार हजार रुपये रक्कम खंडणी स्वरूपात वसूल केली गेली. एका महिन्यात साधारण 1 लाख रुपये रक्कम सामान्य नागरिकांकडून खंडणी स्वरूपात वसूल करत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत.