पुण्यातील रविवार पेठेतील जुन्या वाड्याला आग

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील रविवार पेठेत मीरा दातार दर्ग्याजवळील जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना घडली. यात एक जण जखमी झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाने ही आग काही वेळात आटोक्यात आणली.

युनूस शेख असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते किरकोळ जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवार पेठेत हा जुना वाडा आहे. तीन मजली वाडा पूर्ण लाकडी आहे. येथे कुटुंब राहतात. दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक तिसऱ्या मजल्यावर आग लागली. धूर येत असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती दिली.

काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, छोट-छोट्या गल्या असल्याने अग्निशमनची गाडी येथे आली नाही. जवानांनी पाईपलाईन टाकली आणि पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तर दुसरीकडे इमारतीमधील एकूण 8 सिलेंडर बाहेर काढले. यामुळे मोठा धोका टळला. आग नेमकी कशा मुळे लागली हे समजू शकले नाही.