Pune : रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊलींचा मोलाचा वाटा – के. डी. रत्नपारखी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत वाटचालीमध्ये रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी बहुजनांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, या भावनेतून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना साथ दिली. त्यांच्या प्रचंड त्यागामुळेच आज बहुजनांच्या मुलांना रयत शिक्षण संस्थेतील शिक्षण मिळत आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी के. डी. रत्नपारखी यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील चं.बा. तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साधना (कन्या) विद्यालयातील रयतमाऊलींना रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय अधिकारी के. डी. रत्नपारखी आणि प्राचार्या सुजाता कालेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आदिनाथ पिसे, पर्यवेक्षक प्रतिभा कुंभार, छाया पवार, संजीव हिरे, वंदना पायगुडे, साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्या सुजाता कालेकर म्हणाल्या की, समाजकार्यामध्ये रयत माऊलींचे मोठे योगदान होते. खंबीर पुरुष निर्माण होण्यासाठी एका स्त्रीची साथ महत्त्वाची असते, ती रयत माऊलींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात वाहून घेत दिली. त्यांच्यामुळे बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. रयत शिक्षण संस्था फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात मर्यादित राहिली नाही, तर परदेशातही ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचविण्यात यशस्वी ठरली आहे. रयतमाऊलींमुळे फक्त शिक्षण नाही, तर गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यात रयत शिक्षण संस्था यशस्वी ठरली असे, त्यांनी सांगितले.

उपमुख्याध्यापक आदिनाथ पिसे यांनी आभार मानले.