Pune : रयत सेवक हाच संस्थेचा मानबिंदू – प्राचार्य विजय शितोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आशिया खंडामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ म्हणून काम करत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेने रोझ प्रकल्पाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण पद्धतीदेखील उत्तुंग भरारी घेतली आहे. रयत सेवकांमुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यामुळे रयत सेवक हाच खऱ्या अर्थाने संस्थेचा मानबिंदू आहे, असे प्रतिपादन हडपसरमधील साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील सेवक वसंत रामचंद्र तळेकर यांनी सेवापूर्ती केली, त्यानिमित्त शितोळे यांच्या छोटेखानी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजय शितोळे, रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते सत्कारमूर्तींचे कुटुंबिय -नातेवाईक, शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अनिल वाव्हळ, प्रदीप बागल, पंढरीनाथ कांबळे, लालासाहेब खलाटे यांनीही वसंत रामचंद्र तळेकर यांना विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त तळेकर यांना संस्थेच्या वतीने चांदीचे नाणे, तसेच रयत बँकेच्या वतीने कर्मवीर अण्णांची प्रतिमेचे चांदीचे नाणे व विद्यालयाच्या वतीने सन्मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यवेक्षक प्रल्हाद पवार यांनी प्रास्ताविक केले. सविता पाषाणकर व संगिता रूपनवर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी आभार मानले.