Pune : रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ बनून ठेवत आहे. ज्ञान, विज्ञान संगणक आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात विद्यार्थी घडवत आहे. बहुजनांना शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना आणि वाटचालीमध्ये लक्ष्मीबाई पाटील यांचे मोलाचे योगदान आहे, असे मत साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील साधना विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांच्या हस्ते रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, उपमुख्याध्यापक आदिनाथ पिसे, पर्यवेक्षक प्रतिभा कुंभार, छाया पवार, कला विभागप्रमुख विजय सोनवणे, साधना (मुलांचे) विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते, रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शैला गवारी यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या चरित्राची माहिती सांगितली.

शितोळे म्हणाले की, लक्ष्मीबाईंनी तन, मन, धन अर्पण करून रयत शिक्षण संस्थेची सेवा केली. वसतिगृहातील मुलांना आपल्या मुलांसारखे वागवले. कर्मवीर अण्णांना खंबीर साथ दिली. संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या कोरोनाच्या काळात रयत शिक्षण संस्था शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे पालक वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.

पर्यवेक्षक प्रल्हाद पवार यांनी प्रास्ताविक केले, अनिल वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी आभार मानले.