पुणे : किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअसची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत सर्वाधिक थंडी पुण्यात असल्याची नोंद करण्यात आली. ही नोंद हवामान खात्याने केलेली आहे. शनिवारी पुणेकर थंडीने अक्षरशः गारठले. पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुरेवी चक्रीवादळानंतर शहर आणि परिसरातील आकाश मुख्यतः निरभ्र झालं . परिणामी, उत्तरेतून राज्याच्या दिशेनं वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्याचा थेट परिणाम पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा कमी झाला. पुण्यात रविवारी सकाळपर्यंत किमान तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेलं. कमाल तापमानाचा पारा मात्र सरासरीच्या जवळपास म्हणजे २९.७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदविलं गेलं.

राज्यात थंडीची लाट
गेल्या आठवडाभर बंगालच्या उपसागरात धुमाकूळ घातलेल्या बुरेवी चक्रीवादळानं उत्तरेकडून बाष्प ओढून घेतलं. परिणामी, राज्यातील काही भागात थंडी वाढली. बुरेवी चक्रीवादळ गल्फ व मन्नार भागाजवळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वारे वेगाने वाहत आहे. त्या सोमवारी (ता. ७) तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, दक्षिण केरळ, माहे, लक्षद्वीप या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच अरबी समुद्र व मालदिव या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीजवळील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होणार आहे. या भागात गुरुवारी काही प्रमाणात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक सरी पडतील

मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. राज्यातील पुणे, नाशिक, निफाड, परभणी या भागातील किमान तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअसच्या खाली व दरम्यान आहे. विदर्भात काहीशी थंडी असल्याने किमान तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात थंडीचा प्रवाह वाढल्याने किमान तापमान ८ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.