पुण्याचा पारा वाढला ; गेल्या ३६ वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात सध्या उष्णतेची लाट आहे. सूर्य आग ओकत आहे. महाराष्ट्रात देखील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. सलग तीन दिवस ही उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी उष्णतेने उच्चांक गाठला. स्कायमेट ने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यात शनिवारी तब्बल ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर हे गेल्या ३६ वर्षानंतर सर्वाधिक उच्चांकी तापमान ठरले आहे.

यापूर्वी ३० एप्रिल १९८७ साली पुण्यात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. याबरोबरच राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात नोंदवण्यात आले आहे. अकोल्यात पारा ४६. ७ अंशावर चढला होता. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पारा ४० अंशावर पोहचला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये पारा ४५.१ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. तर मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाळा असह्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार, १८९२, १९७३, १९८९, १९९६, २००५ आणि २००७ ही वर्षे सर्वाधिक उष्णतेच्या लहरीची वर्षे ठरली आहेत. मात्र, या उष्णतेच्या लहरी मे महिन्याच्या अखेरीच्या काळातील आहेत. हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र , गुजरात आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या जास्त दाबाचा पट्टा आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील तापमानामध्ये सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यात ही घ्या काळजी –

– साैम्य रंगाचे, सैल, आणि काॅटनचे कपडे वापरा.

– बाहेर जाताना गाॅगल्स, छत्री, टाेपी, बूट, किंवा चप्पल वापरा

– प्रवास करताना साेबत पाणी घ्या

– आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.

– उन्हात डाेक्यावर छत्री, टाेपीचा वापर करा, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.

– अशक्तपणा, कमजाेरी असेल तर त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्या

– ओआरएस, घरची लस्सी, ताेरणी, लिंबु पाणी, ताक इत्यादी घ्या.

– जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या

– फॅनचा वापर करा, थंड पाण्याने आंघाेळ करा.

उन्हाळ्यात हे करु नका –

– दुपारी १२ ते ३ उन्हात फिरु नका

– मद्यसेवन, चहा, काॅफी आणि कार्बाेनेटेड साॅफ्ट ड्रींक्स घेऊ नका, त्यामुळे डीहाइड्रेट हाेते.

– उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.

– पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना साेडु नका.