Pune : रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पुण्यात कोरोना रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर; भल्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, प्रशासनाची तारांबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू झाले असताना रेमडेसिविर या इंजेक्शनच्या मागणीसाठी पुण्यात नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. भल्या सकाळीच हे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

शहरात रेमिडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. तासंतास रांगेत उभा राहून देखील नागरिकांना ते मिळत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. याच विरोधात आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. भल्या सकाळी काही नागरिक थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. त्यांनी इंजेक्शन मिळत नाही, म्हणून रस्त्याच अडवला. अचानक झालेल्या या गोंधळामुळे मात्र पोलिसांची तारांबळ उडाली. तात्काळ बंडगार्डन पोलीस व वरिष्ठ पोलिसांनी येथे धाव घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून ठिया देत धरणे धरले आहे. पोलिसांनी आता जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. जबाबदार व्यक्ती म्हणून कोणी तरी या नागरिकांशी बोलावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.