‘आम्ही करायचे तरी काय भाडेकरू दुकानदारांचा सवाल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना पाठ सोडायला तयार नाही, तसे दुकानमालक, घरमालक घरभाड्यासाठी तगादा लावत आहेत. बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे, मजूरवर्ग गावाकडे निघून गेला आहे, अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर आमच्यापुढे उभा ठाकला आहे. आता व्यवसाय करायचा की, भाडे द्यायचे, की बँकेचे हप्ते भरायचे अशा भावना अनेक भाडेकरू दुकानमालकांनी व्यक्त केल्या. कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी मागिल दोन महिन्यापासून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात सर्व व्यवहार ठप्प होते. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे काही कंपन्या, दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, मागिल दोन महिन्यापासून उत्पन्नच नाही, आता दुकाने सुरू करूनही ग्राहक नाही, त्यामुळे अनेकांनी भाड्याची दुकाने खाली करण्याचा मनोदय व्यक्त केला. दुकाने सुरू केली तरी मजूरवर्गाची मोठी अडचण आहे. कारण राज्य आणि परराज्यातील मजूरवर्ग गावाकडे निघून गेला आहे, ही दुसरी समस्या उभी ठाकली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्याने लॉकडाऊन सुरूच ठेवले आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे वाहतूक सेवा, उद्योगधंदे, आणि औद्य्ोगिक वसाहती गेल्या अडीच महिन्यांपासून पूर्णत: बंद आहेत. परंतु रुग्ण वाढत असल्यामुळे हा कालावधी अजून वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या परराज्यातील व्यावसायिक, मजूर आणि कामगार आपल्या गावाकडे स्थलांतरित होत आहेत.

कोरोना विषाणूच्या भीतीने धडधड वाढत आहे. त्यातच मागिल दोन महिन्यापासून दुकानाचे भाडे, बँकेचे कर्ज, नोकरांचा पगार अशा एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आता भाड्याची दुकाने खाली करण्यासाठी दुकानदारांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे. कर्जाचे डोंगर अधिक वाढू नये म्हणून अनेक दुकानदारांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे, मात्र याविषयी थेट बोलणे टाळले जात आहे. नागरिकांकडे पैसे नसल्यामुळे कपडय़ांची विक्री होणार नाही, या भीतीने कपडय़ाचे व्यापारी, लॉकडाऊनमुळे रद्द झालेले कार्यक्रम त्यामुळे उत्पन्न थांबलेले कॅटिरग व्यावसायिक तसेच सहलीनिमित्ताने परराज्यात फिरायला घेऊन जाणारे पर्यटन व्यावसायिक यांचाही समावेश आहे.

दरम्यान, अनेक चालाख मंडळींनी मागणी तसा पुरवठा आणि ग्राहकांची गरज काय आहे ताडले. भाजीपाला अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने त्यावर बंदी नाही. तसेच, हॉटेल, खानावळी, मेस बंद झाल्यामुळे प्रत्येक घरोघरी भाजीपाला लागणार हे गृहित धरून आपला मोर्चा भाजीपाला विक्रीकडे वळविला. यामध्ये दलालांनी लगेच शेतकऱ्यांची मैत्री करून थेट माल मागवून घेतला. माल उतरवून घेण्याची ठिकाणी निश्चित केली आणि तेथे शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. त्यानंतर लगेच घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री केली. ही मंडळी फक्त अवघ्या दोन-चार तास काम करून मालामाल होऊ लागली आहेत. त्यांच्या या वागण्याचा त्रास मात्र स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरच बाजार भरत आहे. पुणे-नगर, पुणे-सोलापूर रस्त्यावर शहरालगत भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार होत आहेत. वाहतुकीला अडथळा होत असून, धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीसुद्धा पोलीस मात्र, त्याकडे बघ्याची भूमिका घेत आहेत. पोलीस महापालिकेकडे बोट दाखवत आहेत, तर महापालिका पोलिसांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून मोकळे होत असल्याचे तक्रारदार नागरिकांनी सांगितले.

हातातला रोजगार गेल्यामुळे अनेक तरुण भाजी विक्रीच्या उद्योगाकडे वळले आहेत. कर्जाचे डोंगर उभे राहत असताना दुकाने मोकळी करून हे तरुण रस्त्याच्या कडेला किंवा दुचाकीवर फिरून, चारचाकीमध्ये माल ठेवून नागरीवस्तीजवळ फळे आणि भाजी विकत आहेत. परिस्थिती लवकरच न बदल्यास अनेकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

फुरसुंगीतील टूरिस्ट व्यवसाय करणारे दत्ता देवकर म्हणाले की, आमची वाहने सोलापूरमध्ये अडकली आहेत. त्यासाठी पोलीस स्टेशनकडे वारंवार पास मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आम्हाला कोणी दाद देत नाही, आम्ही कोणाकडे जायचे अशा विवंचनेत सापडलो आहे. मागिल दोन महिन्यापासून व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय करणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. दुकानाचे भाडे द्यावे लागत आहेत, तसेच बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे घरातूनच व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, ट्रॅव्हल्सवरील चालकांचीही आबाळ होऊ लागली. आमच्यासाठी काही तरी करा, असे सांगितल्याने भाड्याचे दुकान बंद करून घरातून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे चालकांनाही काही तरी मदत करता येत आहे.