लॉकडाऊनमुळे मिळकत कर भरण्यात पुणेकरांना मिळणार मुदतवाढ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी कोरोना संकटातही पुणेकरांनी मिळकत कर भरून विक्रम केला होता. यंदाही आघाडी घेतली आहे. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी मिळकत कर भरण्यासाठी पुणेकरांना मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महानगरपालिका १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकत कर भरणाऱ्यांना साधारण करात १० ते १५ टक्के सवलत देते. महापालिकेने प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना अनोखी भेट दिली आहे. यामध्ये मागील सप्टेंबरपूर्वी कर भरणाऱ्या निवासी मिळकतींना राज्यशासनाचे कर वगळून सरसकट १५ टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे महापालिकेला या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक महसूल जमा करावयाचा आहे.

गेल्या वर्षी कोरोना काळातही विक्रमी मिळकत कर भरला गेला होता. मात्र त्यासाठी महापालिकेने ३१ मेची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली होती. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भावयामुळे लॉकडाऊन आहे. मात्र पुणेकरांनी त्यातही मिळकत कर भरण्यात आघाडी घेतली असून १ एप्रिल ते २२ मे अखेर पर्यंत ४४९ कोटींचा महसूल जमा झाला आहे. याच कालावधीत मागील वर्षी १९६ कोटी रुपये जमा झाले होते. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात महापालिकेचे मिळकत कर विभागाचे बहुतांश कर्मचारी अन्य कर्तव्य बजावत असतानाही गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक कर वसूल केला आहे.