Pune News : पुणेकरांना आणखी एक ‘दिलासा’, दुचाकीस्वारांची ‘मास्क’ पासून होणार सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहारात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रशासनाकडून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कडक कारवाई करण्यात आली. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटवण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी खासगी मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना महापालिकेने मास्कमधून सुटका केली होती. आता लवकरच दुचाकीस्वारांची देखील मास्कमधून लवकरच सुटका होणार आहे.

खासगी मोटारीतून प्रवास करताना कुटुंबातील व्यक्ती असले तरी मास्क वापरणे बंधनकारक केले होते. मात्र अनेकांनी यावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. त्याचा विचार करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत खासगी मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना मास्कच्या बंधनातून वगळण्याची सूचना केली होती. मात्र, मोटारीतून प्रवास करणारे हे कुटुंबातील व्यक्ती असले पाहिजेत अशी अट घालण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आता दुचाकीस्वारांना मास्क सवलत देण्याचा विचार सुरु आहे.

दुचाकीवरुन प्रवास करताना वाहनांमुळे तो आपोआपच अंतर राखून असतो. त्यामुळे प्रवास करताना त्याने मास्क वापराला त्याला सवलत देणार आहेत. मात्र, मोटारचालक व दुचाकीस्वार यांनी वाहनातून खाली उतरल्यानंतर मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. विनामास्क वाहनचालक, पादचाऱ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. खासगी मोटारीप्रमाणेच दुचाकीस्वारांना देखील मास्क वापरातून सवलत देण्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.