Pune : नवरात्रानंतर रेस्टॉरंट्सच्या वेळेत वाढ होईल, ट्रेकिंग वरील निर्बंध हटविले जातील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवरात्रानंतर शहरातील रेस्टॉरंट्सना रात्री ११.३० पर्यंत वेळ वाढवून दिली जाईल आणि जिल्ह्यातील ट्रेकिंगवरील (गिरीभ्रमण) निर्बध हटविले जातील असे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

सध्या रेस्टॉरंट्स रात्री १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी तसेच ग्राहकांची मागणी असल्याने रात्री ११.३० पर्यंत ही वेळ वाढवून मिळावी अशी मागणी द पुणे रेस्टॉरंट्स असोसिएशनच्या वतीने आमदार शिरोळे यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली. ती व्यवहार्य असून त्यावर विचार करावा असे सुचविले, आयुक्तांनीही त्यासाठी अनुकूलता दर्शविली आणि नवरात्रानंतर वेळ वाढवून देण्याचे आश्वासन दिले असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

गिरीप्रेमी व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या मागणीनुसार गिरीभ्रमण करणाऱ्यांवरील निर्बंध हटविले जावेत, पर्यटनासाठी किल्ले खुले करावेत, गिरीभ्रमण करणाऱ्यांना सरकारी यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जातो, दंड वसूल केला जातो. तो त्रास थांबवावा अशा मागण्या केल्या होत्या याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीला अनुकूलता दर्शविली आणि या मागण्यांनुसार लवकर निर्बध हटवू असे आश्वासन दिले असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.