Pune : रेस्टॉरंट्स, दुकानांच्या वेळा वाढल्या तरीही उलाढाल वाढेना

पुणे – गेल्या पंधरा दिवसांपासून सगळीकडेच थोडे रिलॅक्स वातावरण असले तरी साथीची धास्ती सरलेली नाही, आर्थिक स्थितीही सुधारलेली नाही. रेस्टॉरंट्स, दुकाने आदी व्यावसायिकांना व्यवसायाच्या वेळा वाढवून मिळाल्या असल्या तरी बाजारपेठेतील उलाढाल वीस टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे.

शहरात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खानावळी, डायनिंग हॉल आदी व्यावसायिकांना व्यवसायासाठी रात्री साडेअकरापर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे तरीही व्यवसाय सरासरी वीस टक्के एवढाच होत असल्याचे या व्यवसायातील मंडळींनी सांगितले. लोकांच्या मनातील कोरोनाची भिती अजूनही कायम असून, लोकांचे उत्पन्न पन्नास टक्के, काहींचे तर त्याहीपेक्षा जास्त घटलेले आहे. त्यामुळे रेस्टॉरंट्स, तत्सम व्यवसाय उभारी घेत नाहीयेत. याबाबत बोलताना दुर्वांकूर डायनिंग हॉलचे शाम मानकर यांनी सांगितले, नोटाबंदीनंतर व्यवसायावर परिणाम झाला तो कोरोना साथ आणि लॉकडाऊनमुळे अधिकच बिकट बनला. ही परिस्थिती लवकर बदलेल अशी चिन्हे नाहीत. लॉकडाऊनच्या काळात परराज्यात गेलेले कामगार पाऊस आणि अन्य कारणांमुळे अद्यापही पुण्यात परतू शकलेले नाहीत. राज्यातील जे कामगार होते ते शेतीच्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे ते परत येण्याच्या तयारीत नाहीत. रेस्टॉरंट्सचा काही मालकांनी सांगितले की, आमचा व्यवसाय ब्रेक इव्हन पॉईंटलाही आलेला नाही असेही या व्यवसायातील मंडळींचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या काळात आपापल्या गांवी गेलेले स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी अद्यापही परत आलेले नाहीत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले खानावळी चालकही चिंतेत आहेत.

सध्या उत्सव आणि सणांचे दिवस आहेत. पण, पूजा साहित्य आणि मध्य वस्तीतील बाजारात मंदीच आहे. मंदिरे बंद असल्याने मोठ्या ऑर्डर्स मिळत नाहीत. शिवाय नागरिकांचे उत्पन्न घटले असल्याने अगदी आवश्यक तेवढीच खरेदी त्यांच्याकडून केली जाते. यंदा चैत्रातील हळदीकुंकू, अश्विनातील भोंडला असे गर्दी होणारे कार्यक्रम महिलांनी टाळले त्यामुळेही पूजा साहित्याच्या उलाढालीवर विपरीत परिणाम झाला. मध्यवस्तीतील जुने व्यापारी शरद गंजीवाले यांनी सांगितले की, उपनगरातील ग्राहक साथीच्या भितीमुळे मध्यवस्तीतील गर्दीत येऊन खरेदी करत नाहीत, संध्याकाळी सात नंतर रिक्षावालेही मिळत नाहीत, लोकांची क्रयशक्ती घटलेली आहे. त्यामुळे मध्यवस्तीतील पूजा साहित्य, कापडबाजार यासह सर्वच बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. किरकोळ विक्रेते तसेच घाऊक विक्रतेही व्यवसायातील उलाढाल व्यवस्थित होईल ना? या शंकेपायी नवीन मालाची ऑर्डर नोंदविण्याची ‘रिस्क’ घ्यायला तयार नाहीत.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. पण, शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. खाजगी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यंदा बोनस मिळण्याची शक्यता अगदी कमी आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसातही बाजारपेठेतील उलाढाल कमीच राहील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.