Pune : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला दुबईत नोकरीचे आमिष दाखवून 12.75 लाख रुपयांना फसविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउन काळात लष्करातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी पावणे तेरा लाख रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 60 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून नुकतेच कर्नल पदावरून निवृत्त झाले आहेत. ते लष्करामध्ये डॉक्‍टर म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांना वैद्यकीय सेवेमध्ये काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे काही ठिकाणी अर्ज केले होते.

त्यानुसार, त्यांना 3 डिसेंबर 2019 या दिवशी अनोळखी व्यक्तीकडून एक ईमेल पाठविण्यात आला. संबंधित ईमेलमध्ये फिर्यादी यांना दुबईतील एका नामांकित रुग्णालयाच्या नावाने त्याच रुग्णालयामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी संबंधित ईमेलला तत्काळ प्रतिसाद दिला. त्यानंतर फिर्यादी यांचा नोकरीचा अर्ज मंजूर करून त्यांना नोकरी मिळाल्याचे भासविण्यात आले.

त्यांना दुबईला जाण्यासाठी व तेथे राहण्यासाठी, तसेच विविध प्रकारच्या प्रक्रियेसाठीचे शुल्क म्हणून वेळोवेळी तब्बल पावणे तेरा लाख रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तींनी ऑनलाईन माध्यमांद्वारे घेतली. फिर्यादी यांनी त्यानंतर संबंधित व्यक्तींकडे नोकरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.