Pune : सायबर गुन्हेगारीत वाढ, भामटयांनी शोधला नवीन फंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यात सायबर गुन्हेगार तेजीत असून आता यात आणखी एक नव्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेल्यानंतर एटीएमने पैसे काढण्याची पूर्ण प्रोसेस केली जाते पण पैसे निघताच मशीनचे रिसेट बटन किंवा इंटरनेट बंद करण्यात येते. त्यामुळे पैसे काढल्याची कसलीच माहिती मुख्य सर्व्हरला होत नाही. अश्या पध्दतीने दोन घटना शहरातील दत्तवाडी व सहकारनगर येथे घडल्या आहेत. त्यामाध्यमातून 8 लाख रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी ऋषीकेश भोसले (वय 34) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅनरा बँकेच्या धनकवडी शाखेचे व्यवस्थापक आहेत. दरम्यान पुणे सातारा रोडवर धनकवडी भागात कॅनरा बँकेचे एटीएम आहे. या एटीएम केंद्रातून चोरट्यांनी बनावट क्रेडिट कार्डचा वापर करून 4 दिवसात 5 लाख 66 हजार रुपये काढले. पण त्याचा पत्ता काही दिवसांनी लागला.

अश्याच प्रकारे सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीत असणाऱ्या एटीएम केंद्रातून दोन दिवसात 2 लाख 46 हजार रुपये काढण्यात आले आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आशुतोष उपाध्याय (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी होते चोरी…

धनकवडी येथील एटीएम केंद्रातून 26 ते 30 सप्टेंबर या चार दिवसात थोडेथोडे करत 5 लाख 66 हजार रुपये काढले आहेत. याठिकाणी दोन क्रेडिट कार्डचा वापर करण्यात आला आहे. पैसे काढण्यासाठी एटीएम आत टाकल्यानंतर अमाउंट टाकली जाते आणि पैसे निघताच मशीनचे रिसेटचे बटन दाबले जाते. यामुळे एका दिवसात 40 हजार रुपये काढण्याचे लिमिट असले तरी ते रिसेट केल्याने पुन्हा पैसे काढता येतात. तर बँकेला (सर्व्हर) याची माहिती होऊ नये यासाठी एटीएमचे इंटरनेट बंद केले जाते. त्यानुसार या चोरट्यांनी दोन्ही ठिकाणावरून पैसे काढले आहेत. बँकेकडून मात्र त्या कार्डची माहिती पोलिसांना दिली गेलेली नाही. तर सहकार्य देखील होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अश्या प्रकारे हिंजवडी व साताऱ्यात देखील गुन्हे घडले आहेत. चोरटे टेक्नोसॅव्ही असल्याचे यावरून दिसत आहे, असे वरिष्ठ निरीक्षक बिडवई यांनी सांगितले.