Pune : अ‍ॅमनोरा पार्कमधील रस्ते विकसकाच्या फायद्यासाठीच ! प्रशासनाने प्रस्ताव स्थगित करावा; भाजप, शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची महापालिकेकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅमनोरा पार्क ही कलेक्टर मान्य टाउनशिप असून अंतर्गत रस्ते विकसकाने स्वखर्चाने करायचे असताना महापालिका पीपीपी तत्वावर ४५ कोटी रुपयांचे रस्ते विकसकाच्या फायद्यासाठी करत आहे, असा आरोप भाजप व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. या प्रस्तावाबाबत प्रशासनाने खुलासा करावा व प्रस्ताव स्थगित करावा अन्यथा राज्य शासनाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही या नगरसेवकांनी पथ विभागाला दिला आहे.

माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी यासंदर्भात महापालिकेच्या पथ विभागाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये पीपीपी तत्वावर खराडी, अ‍ॅमनोरा पार्क आणि मुंढव्यातीलच रस्ते आणि पूल उभारण्याची निवड का करण्यात आली. अ‍ॅमनोरा पार्क ही कलेक्टर मान्य टाउनशीप असून अंतर्गत रस्ते विकसकाने स्वखर्चाने करून नागरिकांसाठी खुले करणे बंधनकारक असताना महापालिका क्रेडीट नोटच्या माध्यमातुन पीपीपी तत्वावर हे रस्ते का करत आहे, याचा खुलासा प्रशासनाने करावा. मुंढवा सर्व्हे नं. ९ ते १४ व खराडी सर्व्हे नं. १६/४ अ या दरम्यान मुळामुठा नदीवर २४ मीटर रूंदीचा पूल बांधण्यासाठी ४० कोटी रूपये प्रस्तावित केले आहेत. सदरचा पूल स्वखर्चाने करण्याचे पत्र विकसकाने पीएमआरडीएला दिले होते, ते पत्रही आणि पुणे महापालिकेला दिले होते त्याच्या प्रति सुध्दा आम्हास उपलब्ध करुन द्याव्यात.

वरील सर्व वस्तुस्थिती आपण महापालिका आयुक्त यांच्या लेखी निदर्शनास आणून हे विषय पत्र स्थगित करावे तसेच वरील मागितलेली सर्व कागदपत्रे आम्हास त्वरित उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी या तीनही माजी नगरसेवकांनी केली आहे.