Pune : अ‍ॅमनोरा टाउनशीप मधील रस्ते PPP तत्वावर? महापालिकेला खड्डयात घालण्यासाठी सत्ताधारी विरोधक साथ साथ ! कुठलिही माहिती न घेता मांडलेले प्रस्ताव प्रशासनाच्या अंगलट?

पुणे :  पीपीपी तत्वावरील रस्त्यांमध्ये ‘ अ‍ॅमनोरा पार्क’ टाउनशीपवर मेहेरनजर दाखविल्याचे उघड झाले आहे. विशेष टाउनशिप अंतर्गत रस्ते विकसित करण्याची जबाबदारी ही टाउनशीपवरच असताना भाजपने या टाउनशिपमधील १८ मी. रुंदीचे साधारण ४५ कोटी रुपये खर्चाचे तीन रस्ते  क्रेडीट नोटच्या माध्यमातून पीपीपी तत्वावर करण्याचा घाट घातला आहे. विशेष असे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पीपीपी तत्वावरील रस्त्यांना विरोधही केला होता, मात्र त्यांच्याच पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्याने ‘विकासाला विरोध नको’ अशी भुमिका घेत समर्थनच केले आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिकदृष्टया खड्डयात घालण्यासाठी ‘हम साथ साथ हैं’ चे चित्र पाहायला मिळत आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने २०२०-२१ च्या अंदाजपत्रकामध्ये मुंढवा, अ‍ॅमनोरा सिटी आणि खराडी परिसरातील ११ रस्ते आणि दोन उड्डाणपुल पीपीपी तत्वावर उभारण्याचे नियोजन केले आहे. क्रेडीट नोटच्या बदल्यात हे रस्ते व उड्डाणपूल विकसित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरही करण्यात आला आहे. तसेच या कामांचे इस्टीमेट व अन्य कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी सल्लागारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पीपीपी तत्वावरील रस्ते व उड्डाणपुल उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनानेच तयार केला आहे.

यामध्ये अ‍ॅमनोरा पार्क या टाउनशीपमधील ३ अंतर्गत १८ मी. रुंद रस्त्यांचाही समावेश आहे. यासाठी साधारण ४५ कोटी रुपये खर्च येणार आहे. वास्तविकत: पीपीपी तत्वावरील सर्वच रस्ते हे नव्याने समाविष्ट झालेल्या केवळ मुंढवा, खराडी व साडेसतरा नळी परिसरातील आहेत. खराडी ते मुंढवा दरम्यान नदीवरील पुलाचे काम हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत असताना स्थानीक बांधकाम व्यावसायीकांनी करून द्यायची तयारी दर्शविली होती. परंतू २०१७ मध्ये हा परिसर महापालिकेत आल्यानंतर त्यांनी नकार दिला. साधारण ५० कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामाचा बोजा महापालिकेवर पडणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व मनसेच्या पदाधिकार्‍यांनीही यावरुन टीकेची झोड उठविली होती. परंतू वरिष्ठ नेत्याकडून ‘विकास कामांत राजकारण नको’ असा मेसेज आल्याने पुढील गोष्टी विनासायास पार पडल्या.

दरम्यान, अ‍ॅमनोरा पार्क ही विशेष टाउनशीप असून व टाउनशिप महापालिकेत समाविष्ट करण्यापासून वगळण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला याठिकाणाहून कुठलेही उत्पन्न अद्याप मिळालेले नाही. विशेष टाउनशीप अंतर्गत सर्वच कामे उदा. रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था उभारणे ही सर्व जबाबदारी संबधित टाउनशीपवरच आहे. असे असताना प्रशासनाने या टाउनशीपमधील रस्ते पीपीपी तत्वावर करण्याचा व त्याबदल्यात संबधित विकसकाला क्रेडीट नोट देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या विकासामागील ‘गुपित’ हळूहळू बाहेर येउ लागले आहे.

महापालिका हद्दीत ११ गावे समाविष्ट होण्यापुर्वी अ‍ॅमेनोरा पार्क टाउनशीपला परवानगी देण्यात आली आहे. २०१७ ला गावे समाविष्ट होईपर्यंत तेथील नियोजन पीएमआरडीए कडे होते. या परिसरातील रस्त्यांचा आरपीमध्ये समावेश होता. राज्य शासनाने विशेष टाउनशीपचा दर्जा देताना कोणत्या सवलती दिल्या होत्या किंवा कोणत्या अटी घातल्या होत्या, या निर्णयाच्या प्रति नगर रचना व पीएमआरडीएकडून मागविण्यात आल्या आहेत. या निर्णयांची माहिती घेतल्यानंतरच अ‍ॅमेनोरा पार्क टाउनशीपमधील पीपीपी तत्वावरील कामांबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

– कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.

अ‍ॅमनोरा पार्कला विशेष टाउनशीपचा दर्जा देण्यात आल्याने, अंतर्गत विकासाची कामे करण्याची जबाबदारी ही टाउनशीपचीच आहे. प्रशासनाने सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली या टाउनशीपमधील रस्ते पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रस्ते सत्ताधार्‍यांनी अंदाजपत्रकातही घेतले आहेत. यापुर्वी २०११ मध्ये पीपीपी तत्वावर रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. त्यामध्ये महापालिकेची मोठी फसवणूक झाली आहे. असे असताना आयुक्तांनी कुठलिही खातरजमा न करता अ‍ॅमेनोरा पार्कमधील रस्ते विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पीपीपी तत्वावरील हे रस्ते रद्द करावेत आणि आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत केली.