Pune : पोलिसांची ‘वर्दी’ घालून दरोडेखोरांचा खेड शिवापूर परिसरात ‘थरार’ ! गोळीबार करून सोनं लूटल्याच्या घटनेनं प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर भागात एका सराफी दुकानात भरदिवसा दरोडेखोरांच्या टोळीने घुसून गोळीबार करत सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून आले होते. यात सुदैवाने गोळी कोणाला लागली नसल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी खेड शिवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर परिसरात कोपरहुळ गावाजवळ बालाजी ज्वलर्स हे दुकान आहे. याठिकाणी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक एका कारमधून पोलिसांच्या गणवेश घालून सराफी दुकानात आले. त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी येथील एकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोराने गोळीबार करून तेथून पळ काढला.

मात्र सुदैवाने यात गोळी लागली नाही. दरोडेखोर पसार होताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यात नेमके सोने किती लुटून नेण्यात आले हे समजू शकलेले नाही. दरोडेखोर चारचाकीत पसार झाले असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांना देखील याची माहिती दिली आहे.