Pune : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; खेड शिवापूर येथील खळबळजनक घटना, 2 लाख 37 हजारांची रक्कम लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील कुदळे ॲण्ड सन्स एचपी पेट्रोल पंपावर दोन अज्ञातांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दरोडा टाकला. या दोघांनी २ लाख 37 हजार ५०० रुपये रोख व दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. १०) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत राजगड पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 12:05 च्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापुर (ता. हवेली) गावच्या हद्दीत एल कुदळे ॲण्ड सन्स पेट्रोलपंप आहे. त्या पंपावरील ऑफिस रूममध्ये अमोल भीमराव पंडित (वय 31) व सुदर्शन देवीदास वानखेडे हे दोन कामगार दिवसभरातील पेट्रोल-डिझेलची विक्री केलेल्या पैशांचा हिशोब करीत होते.

यावेळी दोन अनोळखी ऑफिसमध्ये घुसले. त्यांच्या जवळील दोन रिव्हॉल्व्हर कामगारांवर रोखून धरून त्याचा धाक दाखवत 2 लाख 37 हजार ५०० रुपये रोख व दोन मोबाईल असा एकूण किंमत रुपये २ लाख 47 हजार ५०० रुपयांचा माल घेऊन त्यांनी मोटारसायकलने पोबारा केला. त्या दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम करत आहेत.