Pune : लष्करातील कर्मचार्‍यांकडून बाद झालेल्या 1 हजार रुपयांच्या नोटा जप्त; बाद नोटा दाखवून लाखोंची फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो, असे सांगून कमिशनच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीचा पोलिसांनी पडदा फार्श केला आहे. लष्करात नाईक असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (वय ३६, रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मुळ गाव ता. बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार नवाब अली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धायतिडके याच्याकडून जुन्या बाद झालेल्या १ हजार रुपयांच्या ५६ खर्‍या नोटा, भारतीय मनोरंजन बँक, व ५०० रुपयांसारख्या दिसणार्‍या बनावट नोटा, मोटार असा एकूण २७ लाख ३५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे सहायक फौजदार तानाजी कांबळे यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तानाजी कांबळे यांना अण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रेंजहिल्स येथील धायतिडक याच्या घरावर छापा घालून या बाद झालेल्या व बनावट नोटा ताब्यात घेतल्या. त्याचा साथीदार नवाब अली हा आपण चित्रपटसृष्टी काम करत असून शुटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत असे.

ही टोळी एखादे सावज हेरत. त्याला एक केंद्र सरकारने जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे बनावट सक्युलर दाखवत. आमच्याकडे १ हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडिओ दाखवत. त्यात ते वर १ हजार रुपयांची जुनी बाद झालेली नोट लावून खाली बनावट नोटाचे बंडल असेल. त्यानंतर त्यांना एखादा बँकवाल्याला शोधायला सांगत. बँकर आणि २ हजार रुपयांच्या खर्‍या नोटा आणल्यास मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत. त्यानंतर सर्व व्यवहार करुन देतो, आम्हाला त्याबदल्यात कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून कमिशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यातील एकाला अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून कमिशन पोटी तब्बल ४ लाख रुपये लुबाडले होते. सातार्‍यामध्येही त्यांनी एकाला अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.