2 भावांच्या मृत्यू प्रकरणाच्या कामात हलगर्जीपणा, पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकास आयुक्तांचा ‘दणका’ ! पगारातून दरमहा 10 हजार रुपये 2 वर्षे ‘कपात’ करण्याची ‘शिक्षा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याने तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पोलीस मासिक पगारातून महिन्याला 10 हजार रुपये 2 वर्षे कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे. युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताचे हे प्रकरण आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

विरारमध्ये ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये ही घटना घडली होती. युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सादर करताना विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या, केवळ नावात साम्य असलेल्या ३ अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होऊन प्रस्तावाबरोबर जोडायची कागदपत्रे ही नियोजित हद्दपार इसमाचीच असल्याची खातरजमा न करता पूर्वग्रहदूषित हेतूने प्रेरित होऊन वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला. विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली होती. भावाला न्याय मिळावा, यासाठी दोन महिने प्रयत्न केल्यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने २० जानेवारी २०१८ रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाल्यानंतरही त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही, असे त्यांच्यावर आरोप ठेवले. तसेच अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.

या विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष लक्षात घेऊन पोलिसांची प्रतिमा
मलिन केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी युनूस शेख यांच्या पगारातून २ वर्षे दर महिन्याला १० हजार रुपये कपात करण्याची शिक्षा
सुनावली आहे.

यावेळी वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख व इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. सीआयडीने युनूस शेख यांना मार्च २०१८ मध्ये अटक देखील केली होती. याप्रकरणात अपर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर आता त्यांची पुण्यात नियुक्ती झाली असल्याने विभागीय चौकशीचा अहवाल पुणे पोलिसांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.