Pune : आरटीओ एजंटने तरुणाला घातला दीड लाखांचा गंडा, FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – प्रवाशी गाडीची खासगी वाहतूकीच्या संवर्गात नोंदणी करण्यासाठी आरटीओ एंजटने तरूणाला तब्बल 1 लाख 47 हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी संबधित आरटीओ एजंटावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अझिम मिसार इबुशे (वय 28, रा. कोल्हापूर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विशाल अर्जुन सोनवणे (रा. थिटे वस्ती, खराडी ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अझिम यांची मोटार टुरिस्ट आहे. त्यामुळे त्यांनी आरोपी विशालची भेट घेऊन मोटारीची आरटीओ कार्यालयात खासगी नोंदणी करण्याची मागणी केली होती. या कामासाठी आरोपी विशालने अझिमला 1 लाख 25 हजार आणि वैयक्तिक 5 हजार रूपये असा खर्च सांगितला होता. त्यानुसार मोटारीची प्रायव्हेट नोंदणीसाठी फिर्यादीने विशालला एनइएफटी करून तब्बल 1 लाख 47 हजार रूपये पाठवले होते. मात्र, त्यानंतर आरोपीने मोटारीची नोंदणी प्रायव्हेट करून दिली नाही. त्यामुळे फिर्य़ादीने आरोपीला फोन केला. त्यावेळी आरोपीने मी तुमचे काम करू शकत नाही, असे सांगून फसवणूक केली. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.