पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षकांसह तिघांना शिक्षा

जामखेड येथील न्यायालयाचा निकाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन- कर्जतचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक व सध्या पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव व इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जामखेड येथील न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आष्टी तालुक्यातील व्यक्तीस मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांनाही दोषी ठरविले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास शिक्षा झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक संदीप सुखानंद जाधव, पोलीस नाईक सचिन मिरपगार, मुस्ताक पठाण या तिघांना शिक्षा झाली आहे. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी तीन महिने साधा कारावास व प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

कर्जतचे तत्कालीन पोलिस उपधीक्षक संदीप जाधव व इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी जामखेड येथे नामदेव रघुनाथ राऊत (रा. आष्टी, जि. बीड) या शेतकऱ्यास मारहाण केली होती. मारहाणीनंतर राऊत हे जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते. पोलीस प्रशासनाने तक्रारीची दखल न घेतल्याने राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जामखेड येथील न्यायालयात सदर खटला चालला. न्यायालयाने तत्कालीन पोलिस उपअधीक्षक व सध्याचे पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक जाधव व इतर 2 पोलीस कर्मचाऱ्यांना भारतीय दंड विधान कलम 323, 506 अन्वये साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.