बारामती : दुर्देवी ! खोकल्याचं औषध समजून विष प्राशन केल्यानं पोलिसाचा मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोपट दराडे (वय 45 रा. मूळ अकोले. ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोपट दराडे यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून पीकावर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना मी हे औषध प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दराडे यांनी पुणे शहर, देहूरोड, इंदापूर, बारामती शहर व गेली पाच वर्ष ते बारामती तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.