Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार, तरूण थोडक्यात बचावला

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन या प्रकरणात संबंधित तरुण थोडक्यात बचावला असून घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि.२६) रोजी सायंकाळच्या सुमारास प्रविण गोकुळ गव्हाणे (वय.२४,रा.पाबळ फाटा) हे त्यांच्या बुलेट मोटारसायकल वरुन सी.टी.बोरा कॉलेज रोड वर व्हीजन स्कुल समोरुन जात असताना अव्हेंजर दुचाकी वरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांना मोटारसायकल आडवी मारुन थांबविले. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात कोयता होता.तसेच त्याचवेळी पाठीमागुन तीन व्यक्ती हे दुचाकीवरुन आले.त्यापैकी एकाच्या हातात कोयता,एकाच्या हातात पिस्तुल व तिस-या व्यक्तीच्या हातात तलवार अशी हत्यारे होती. या हल्लेखोरांनी फिर्यादी गव्हाणे यांना कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला माञ त्यावेळी फिर्यादी यांनी झालेला हल्ला चुकवत तिथुन दुचाकी सोडुन पळ काढला. त्यातील एकाने हातातील पिस्तुलाने गोळ्या झाडल्या माञ फिर्यादी गव्हाणे यांनी गोळ्या चुकवुन तेथुन पळ काढला.

या प्रकरणी प्रविण गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिरुर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असुन पुढील तपास सुरु आहे. घटनेची माहिती कळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

एकाच महिन्यात दुस-यांदा गोळीबाराची घटना
शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत एकाच महिन्यात दुस-यांदा गोळीबाराची घटना घडली असुन यापुर्वी टाकळी हाजी येथे झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यु झाला आहे. तर शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या दुस-या घटनेत फिर्यादी थोडक्यात बचावला आहे.

कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे
शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत शांतता कायम असताना पुन्हा युवकांकडुन गोळीबाराच्या गंभीर घटना घडत असल्याने कायदा व सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत या पुर्वी सर्वाधिक गावठी पिस्तुल हडपसर पोलिसांनी जप्त केले होते. त्याचप्रमाणे दोनच दिवसांपुर्वी न्हावरे फाटा परिसरात गावठी पिस्तुल बाळगणारे गजाआड़ करण्यात आले होते. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत वाढणारे हल्ले चिंताजनक असुन शिरुर पोलिस हे प्रकार गांभिर्याने घेणार का असा सवाल नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. तर औद्योगिक परिसरामुळे वाढत्या स्पर्धातुन गावठी कट्टा बाळगण्याची फॅशन उदयास येऊ लागली आहे हे रोखण्याचे मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आहे.