Pune Rural News : मंचरमध्ये बँकेच्या कॅश डिपॉझीट मशीनवर चोरट्यांनी मारला डल्ला, 18 लाख 53 हजार रुपये लंपास

मंचर: शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅश डिपॉझीट मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. यामध्ये मशिनमध्ये सुमारे १८ लाख ५३ हजार रुपये होते. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. याबाबतची फिर्याद मॅनेजर वंदना पांडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे- नाशिक महामार्गालगत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासमोर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेच्या बाहेरील बाजूस एटीएम मशीन, कॅश डिपॉझिट मशीन व पासबुक प्रिंटिंग मशीन अशी तीन मशीन आहेत. शुक्रवारी पहाटे सहा चोरट्यांनी कॅश डिपॉझिट मशीन टेम्पोला बांधून बाहेर ओढत आणले. त्यानंतर हे मशीन टेम्पोत टाकून काही क्षणात चोरटे पळून गेले. मशीनमध्ये १८ लाख ५३ हजार ८०० रुपये हाेते. त्यामध्ये ५०० च्या दोन हजार ८०२ नोटा, २०० च्या ७२६ नोटा, १०० च्या ६१६ नोटा होत्या. तर मशीनची ५० हजार रुपये किंमत असून एकूण १९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकूण 19 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे यांनी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. त्याबरोबर काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास सुरु झाला आहे. तर एक पथक चोरट्यांच्या मागावर गेले असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.