ग्रामीण पोलिसांकडून एटीएम फोडणार्‍या टोळीला अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेल्या गॅसचा कोडवरुन एजन्सीने दिलेल्या खुनेच्या आधारावर शोध घेताना त्या आरोपीने उपचाराचे पैसे ऑनलाईन केल्याने त्याच्यापर्यंत लोणी काळभोर पोलिसांना पोहोचण्यास मदत मिळाली असून गुन्हे प्रकटीकरण खात्याने या एटीएम फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून तीन जनांना गजाआड केले आहे.

पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन व खडकी येथील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गणेश बाळु लोकरे (वय- 23, रा. वडोळी आडेगाव ता. माढा जि. सोलापुर) हा एटीएम फोडणाऱ्या टोळीचा प्रमुख असुन, लोणी काळभोर पोलिसांनी गणेश लोकरेसह संकेत ज्ञानेश्वर काकडे (वय- 23, रा. सावडी ता. करमाळा जि. सोलापूर) व किरण दादा गाडे (वय- 24, रा. खडकपुरा ता. करमाळा जि. सोलापूर) या तीन जणांना अटक केली आहे. वरील तीनही आरोपींनी पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) व खडकी (ता. दौंड) येथील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात झाला होता. तर त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा असाच एटीएम फोडण्याचा प्रयत्न खडकी ता दौंड येथे झाला होता. यावर लोणी काळभोर गुन्हे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख राजू महानोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उरुळी कांचन येथील बॅंकेच्या सीसीटिव्हीची पाहणी केली असता, पोलिसांना मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या पथकाने खडकी येथील बॅंकेची पाहणी केली असता, उरुळी कांचन प्रमाणेच तीन जणांच्या टोळक्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना आढळून आले.

यावेळी खडकी येथील एटीएम शेजारी पोलिसांना चोरट्यांनी गॅस कटरसाठी वापरलेला गॅस व ऑक्सिजन सिलेंडर आढळुन आला. या सिलेंडरवरील कोडनंबरवरुन सिलेंडरची विक्री करणाऱ्या दुकानदाराचा पत्ता मिळवला व संबधित दुकानदाराकडे सिलेंडर घेऊऩ जाणाऱ्याची चौकशी केली असता, दुकानदाराकडे त्या व्यक्तीची नावे उपलब्ध नव्हती परंतु सिलेंडर घेऊन जाणाऱ्या पैकी एकाच्या नाकाला मोठी जखम झाली असल्याची माहिती त्यांना पोलिसांना दिली.

यावर पोलिसांनी पाटस परीसरातील सर्वच खाजगी रुग्नालयात उपचार घेऊऩ जाणाऱ्या रुग्नांची माहिती घेतली असता, एका रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एकाने नाकावर उपचार करुन घेतल्याची माहिती मिळाली पण रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी उपचार घेणाऱ्या रुग्णाने उपचाराचे पैसे ऑनलाईनचा वापर करुन दिल्याची माहिती महानोर यांना रुग्णालयाने दिली.यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, समीर चमणशेख, सागर कडू, रोहिदास पारखे यांनी या ऑनलाईन पेमेटचा वापर करणारा व इतर दोघे अशा तिघांना मोठ्या शिताफीने अटक केली. हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी या कामगिरीबद्दल पथकाचे अभिनंदन केले.