साप चावलेल्या व्यक्तीवर जादूटोणा, रांजणगाव पोलिसांकडून मांञिक ताब्यात

पोलिसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यात सध्या ऊस तोडीचे जोरदार काम सुरु आहे.असेच ऊस तोड करत असताना एका ऊस तोड मजुराला विषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर अघोरी उपचार करणा-या मांञिकाला पोलिसांनी अटक केली असुन त्या मजूरावर वेळीच उपचार मिळाल्याने उसतोड मजुराचे प्राण वाचले असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिली आहे.याबाबत मंञ-तंञाद्वारे विंचु उतरविणा-या मांञिकाविरुद्ध रांजणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गणेगाव खालसा येथे उस तोडणी मजुराला विषारी साप चावल्याने त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात न नेता मांञिकाद्वारे अघोरी उपचार करण्याबाबत येत असल्याबाबत माहिती मिळाली.त्यानुसार तात्काळ रांजणगावचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी पोलिस पथक तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली.या वेळी माहिती घेतली असता उसतोड मजुर अंकुश बंडु वाघ(रा.देवघट,ता.मालेगाव,जि.नाशिक) यास उसाच्या फडात विषारी सापाने दंश केला होता व त्याच्यावर कथित मांञिक जयवंत श्रीपती शिंदे(रा.गणेगाव खालसा) हा मंञ-तंञाद्वारे अघोरी उपचार करताना दिसुन आला.यावेळी सदर पोलिसांच्या पथकाने उसतोड मजुराची मांञिकाची ताब्यातुन सुटका करुन तत्काळ दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले.वेळेत औषधोपचार मिळाल्याने उसतोडणी कामगाराचे प्राण वाचले आहेत.

या प्रकरणी मांञिक जयवंत शिंदे यांच्या विरुद्ध पोलिस पाटील विनायक दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन मांञिकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिली आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सु्रेशकुमार राउत,पोलिस नाईक एम.बी.काळकुटे,व्ही.पी.मोरे,व्ही.एन,मोहिते,आर.बी.होळनोर,महिला पोलिस अंमलदार शुभांगी पवार,निर्मला ओव्हाळ यांच्या पथकाने केली.