Pune : ‘इंडियन नेव्ही’त नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

भिगवण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयएनएस शिवाजी लोणावळा येथील इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो असे आमिष दाखवून दोघांनी अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. इंडीयन नेव्हीमध्ये नेमणुकीस नसताना सुद्धा इंडीयन नेव्हीचा ड्रेस घालून अधिकारी आहे असे भासवून त्या दोघांनी दोन वर्षापूर्वी दौड तालुक्यातील कुरकुंभ येथील एका बेरोजगार तरुणीची फसवणूक केली होती. फसवणूक झालेल्या तरुणाकडून भिगवण व लोणावळा येथे एकुण 3 लाख 80 हजार रूपये घेवून आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाच्या बनावट ई मेलवरून इंडीयन नेव्हीचे बनावट नियुक्ती पत्र, अ‍ॅडमीट कार्ड पाठवले. मात्र ते खोटे असल्याचे समोर आले. अशा प्रकारे आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या दोन तोतया अधिकाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

नितीन तानाजी जाधव ( वय – 30 रा.कल्पनानगर, बारामती) व आकाश काशिनाथ डांगे (वय- 25 रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी किशोर दादा जाधव (रा. कुरकुंभ ता. दौंड जि.पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भिगवण पोलिसांनी आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी आकाश डांगे याने आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी किशोर जाधव या तरुणाने पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांची भेट घेऊन फसवणूकीचा झालेला प्रकार सांगितला. हा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी चौकशी करून माहिती घेतली असता किशोर जाधव या तरुणासह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती मिळाली.

या गुन्ह्यतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपास सुरु करण्यात आला. या पथकाने बारामती येथून आरोपी नितीन जाधव याला ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान या रॅकेटचा मुख्य सुत्रधार आकाश डांगे हा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी डांगे याला फलटण येथून ताब्यात घेतले. दोघांकडे प्राथमिक चौकशी केला असता त्यांनी पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा विदर्भ जिल्हयातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांची फसवणूक केल्याचे समोर आले. या दोघांनी ओळखीचे एजंटमार्फत इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी 2 ते 4 लाख याप्रमाणे कोट्यावधी रूपये घेवून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे सांगितले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश चव्हाण, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, पोलीस नाईक सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत, अक्षय नवले यांच्या पथकाने केली.

आरोपीचा अलिशान बंगला, फॉरच्युनर गाडी
आकाश डांगे याने अल्प कालावधीच बेरोजगार युवकांना गंडा घालून कोट्यावधी रुपयाची माया गोळा केली होती. काही वर्षांपूर्वी गरिबीत दिवस काढलेला आकाश डांगे हा फलटण पंचक्रोशीत फॉरच्युनर, वेरना या आलिशान गाडया फिरवत पैशाची उधळण करीत होता. नुकताच त्याने मोठा अलिशान बंगला बांधला होता. त्याचेकडे एवढा पैसा अचानक कोठून आला ? याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु हा महाठग आहे याची कोणाला कल्पनाच नव्हती.

पोलिसांकडून तरुणांना आवाहन
बेरोजगार तरूणांकडून “भारतीय सैन्यदलात तसेच इंडीयन नेव्ही” मध्ये नोकरी लावण्यासाठी लाखो रूपये घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे (फोन नं.020-25651353) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.