सराफी व्यापार्‍याला लुटणार्‍यांना 48 तासात अटक, 3 कोटी 70 लाखाचं 9 किलो 600 ग्रॅम सोनं पुणे ग्रामीण पोलिसांकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोलकत्ता ते मुंबई प्रवासादरम्यान दौंड रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या सराफी व्यापार्‍यांना प्रवासादरम्यान चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील कोट्यावधी रूपये किंमतीचं सोनं लुटणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 48 तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 कोटी 70 लाख 71 हजार रूपये किंमतीचं 9 किलो 600 ग्रॅम वजनाचं सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

गणेश दगडु पवार (27), अभिजित उर्फ बाळु दिलीप चव्हाण (23, दोघे रा. महुत, नागणखोरा, ता. सांगोला, जि. सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलानी (25) आणि प्रथमेश विजय भांबुरे (26, दोघे रा. दिघंची, कटफळ गल्ली, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि इंडिगो कार असा एकुण 3 कोटी 70 लाख 71 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी आप्पा श्रीराम कदम यांनी फिर्याद दिली होती.
Pune Police

कदम यांना व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवण्याची सवय होती. आरोपींनी फिर्यादी कदम यांच्या स्टेटसवर लक्ष ठेवुन हे कृत्य केलं आहे. कदमांनी गुड बाय कौठळी असं स्टेटस ठेवलं होतं. कदमांचं स्टेटस पाहून आरोपींनी तो घर सोडून सोनं आणण्यास गेल्याचं ओळखलं. दि. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे कदम आणि त्यांचे साथीदार दौंड रेल्वे स्टेशनवर उतरले. त्यानंतर प्रवासी म्हणून आरोपींच्या कारमध्ये बसले. प्रवासादरम्यान आरोपींनी त्यांना चाकुचा धाक दाखविला आणि त्यांच्या कमेरला असलेली सोन्याची बिस्कीटं काढून घेतली. शस्त्राचा धाक दाखवुन लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ गुन्हयाचा छडा लावण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक घनवट, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक उपनिरीक्षक दयानंद लिमण, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजु पुणेकर, मुकूंद अयाचित, पोलिस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, प्रविण मोरे, नितीन भोर आणि कर्मचारी अक्षय जावळे यांच्या पथकाने प्रकणाचा अवघ्या 48 तासात छडा लावला आणि आरोपींकडून 9 किलो 600 ग्रॅम सोनं, इंडिगो कार असा एकूण 3 कोटी 70 लाख 71 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला. पोलीस अधीक्षकांनी या गंभीर गुन्ह्याचा छडा तात्काळ लावल्याबद्दल पोलिस पथकाला 35 हजार रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Visit : Policenama.com