बारामतीत 46 लाखांचा 312 किलो गांजा जप्त, 4 जणांना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती ग्रामीण पोलिसांनी भर पावसात सोमवारी (दि.21) मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी 46 लाख रुपये किंमतीचा 312 किलो गांजा जप्त केला आहे. आंध्रप्रदेशातुन आणलेला गांजा पाटस-बारामती मार्गावरुन नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोचा भरपावसात पाठलाग करुन ही कारवाई केली. पोलिसांनी गांजाचा टेम्पो (एमएच 10 सीआर 4626) पकडून चार जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात विक्री करण्यासाठी विशाखापट्टणम येथून 312 किलो गांजा येणार होता. याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. पण इतके करुनही टेम्पो निघुन गेला. त्यावेळी पोलिसांनी सरकारी वहानासह खासगी कारमधुन टेम्पोचा चित्रपटात शोभेल असा पाठलाग करुन टेम्पो अडवला. अन् गांजा आणि आरोपींना अटक केली. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.

विजय जालिंदर कणसे (वय-26 रा. कानरवाडी, ता. कडेगाव जि. सांगली), विशाल मनोहर राठोड (वय-19 रा. नागेवाडी, विटा, ता. खानापूर), निलेश तानाजी चव्हाण (वय-32 रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) आणि योगेश शिवाजी भगत (वय-22 रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.