पुण्यातील शिरूर येथील 6 मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील अवैध धंद्याचे जाळे वाढतच चालले असून, बारामती गुन्हे शाखेने शिरूर शहरात एकाचवेळी तब्बल 6 मटक्याच्या जुगार अड्यांवर छापेमारी केली आहे. येथून 79 हजाराची रोकड जप्त करत 8 जणांना पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, स्थानिक पोलिसांना हे मटक्याचे अड्डे माहिती नव्हते की सोईस्कर त्याकडे दुर्लक्ष केले जात होते, अशी चर्चा सुरू आहे.

मटका मालक शशी निवृत्ती खांडरे (रा. वाडा कॉलनी शिरूर ता. शिरूर) याच्यासह मटका घेणार्‍या संदीप विठ्ठल जाधव (रा लाटेआळी.शिरूर), गणेश नामदेव माने (रा. ढोर आळी शिरूर), चंद्रकांत अमृतराव गवारले (रा. पवार माढा शिरूर), तोसिफ नजीर इनामदार (रा पाबळ ता शिरूर), मोहिनुद्दीन गुलाम हुसेन काजी (रा. कुंभार आळी शिरूर), सुभाष ओंकार भोंगळा (रा इंदिरानगर शिरूर) आणि बाळू मूलचंद शर्मा (रा भाजीबाजार शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या जुगार कायद्यान्वये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बारामती गुन्हे शाखेकडून बारामती विभागातील अवैध धंद्यावर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत अप्पर पोलीस अधीक्षक जंयत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू माफिया तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, शिरूर शहरामध्ये अवैध मटका जुगार सुरू असल्याची देखील माहिती मिळाली. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेचे चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने एकाचवेळी अचानक 6 मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकत पर्दाफाश केला. 7 जन कल्याण मटका नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे यावेळी समोर आले आहे.