ग्रामीण पोलिस दलातील 2 कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना आज (शुक्रवारी) तात्काळ निलंबीत करण्यात आले आहेत. त्यांच्या निलंबनाचे आदेश आज निर्गमित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.

पोलिस हवालदार सुनिल तुळशीराम मगर (बक्‍कल नं. 548) आणि पोलिस कर्मचारी सुनिल बाबुराव कदम (बक्‍कल नं. 2326) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. पोलिस हवालदार मगर आणि पोलिस कर्मचारी कदम यांनी कर्तव्यावर हजर असताना पोलिस दलास अशोभनीय असे गैरवर्तन केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे शिस्तभंगविषयक कार्यवाही अंतर्गत मगर आणि कदम यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करण्यात आले आहेत. दोघांच्याही खातेनिहास प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीअंती अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर मगर आणि कदम यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.