कोथरूडमधील आयुर्वेदिक संशोधन संस्थेमधून चंदनाची झाडे चोरीला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोथरूड परिसरातील क्षेत्रीय आयुर्वेदिक मौलीक संशोधन संस्थेतून चंदनाची चार झाडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चारही झाडे कापून नेण्यात आली आहेत. याप्रकरणी संस्थेतील अधिकारी श्रीनिवासन मुथ्थू (वय ४१, रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पहाटे चोरटे गांधी भवन परिसरातील आयुर्वेदिक मौलीक संशोधन संस्थेच्या आवारातील सीमाभिंतीवरुन उडी मारुन शिरले. चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने चंदनाची चार झाडे कापून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संस्थेकडून तक्रार देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करत आहेत.

शहरातील महत्वाच्या संस्था तसेच शासकीय कार्यालयांच्या आवारात चंदनाची झाडे आहेत. यापूर्वी शासकीय संस्थांच्या आवारात शिरुन चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.