‘कोरोना’विषयक नियमांचं पुणेकरांकडून उल्लंघन, महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने उद्याने खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन (Violating corona rules and regulation) केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिध्द अशी सारसबाग आता अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने (Pune Municipal Corporation Horticulture Department ) घेतला आहे.

उद्यानात 10 वर्षांखालील मुले, 65 पेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिकही सारसबागेत येत असल्याचे आढळले. तसेच उद्यानांमधील व्यायामाचे साहित्य वापरणे, विना मास्क उद्यानात फिरणे आदी प्रकार आढळून आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून रखवालदारासोबत हुज्जत घातल्याचाही प्रकार सारसबागेत घडला होता. या सर्व प्रकारामुळे सारसबाग आता अनिश्चित कालावधीसाठी बंद करत असल्याचे उद्यान विभागाच्या अधिका-याने सांगितले. सारसबागेसह हडपसरमधील आणखी एक बाग 14 नोव्हेंबरपासून बंद केली आहे. याचबरोबर शहरातील इतर उद्यानांमध्येही कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तीही उद्याने बंद करण्यात येतील, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, पुणे शहरात लहान- मोठी अशी एकूण 204 उद्याने आहेत. त्यात महापालिकेने 1 नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात 81 उद्याने खुली केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने मिशन बिगेन अगेन असे म्हणत राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून बंद असलेली उद्याने खुली केली. मात्र, नागरिकांकडून कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास येत असल्याचे उद्यान विभागाने म्हटले आहे.

दगडूशेठ मंदिर तीन टप्प्यात सुरू होणार
पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिर उद्यापासून (16 नोव्हेंबर) तीन टप्प्यात सुरू होणार आहे. त्यासाठी मंदिरात साफसफाई सुरू केली आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे मार्किग आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यात गणेशभक्तांना फक्त दर्शन घेता येणार आहे.. हार तुरे नारळ असे पूजेचे कुठलेच साहित्य मंदिरात आणता येणार नाही. तसेच मास्कशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती दगडूशेठ मंदिराचे सचिव महेश सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.