‘सारथी’ संस्थेसाठी छत्रपती संभाजीराजेंचं पुण्यात ‘उपोषण’ सुरू !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सारथी संस्थेची स्वायत्ता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पुण्यात लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे. या संस्थेबाबत सरकारकडून रचण्यात येणारं षडयंत्र थांबवण्यात यावं आणि संस्थेसाठी निधीची सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे. सारथी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सरकारने जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरू असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

मराठा, कुणबी आणि कृषी क्षेत्रातील बहुजन समाजाच्या विकासासाठी सारथी संस्थेची स्थापना केली गेली आहे. सारथी संस्थेला 9 महिने झाले आहेत. मराठा समाजातील मुलांना आर्थिक शैक्षणिक उन्नती मिळावी यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सरकारने अनेक निर्बंध यावर लादले आहेत.

सारथी संस्था अस्तित्वात पुन्हा बहाल व्हावी यासाठी पीएचडीचे विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज दिवसभर ते उपोषणाला बसणार आहेत. संभाजीराजे नागपूरमध्ये उद्धव ठाकरे तसेच इतर काही मंत्र्यांना भेटले होते. परंतु सारथी संस्थेबाबत कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. या संस्थेबाबत सरकारने केलेले बदल अनेक विद्यार्थ्यांना मान्य नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही. त्यांची आर्थिक अडचण वाढत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/