Pune : महात्मा फुलेंच्या विचारांची पेरणी करण्यातच समाधान – प्राचार्य रवींद्र वाघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आज सर्व समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्याग अद्याप तळागाळापर्यंतच्या पोहोचला नाही. त्यांच्या विचारांची पेरणी करून जयंती साजरी करण्यात समाधान वाटते, असे मत महात्मा फुले विद्यानिकेतनच्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र वाघ यांनी व्यक्त केले.

हडपसर (ससाणेनगर) येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयामध्ये प्राचार्य वाघ यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्याचे सांगितले.

राज्यभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंडला शनिवार, रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हडपसर आणि परिसरामधील नागरिकांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरोघरी साजरी केली. शैक्षणिक, सामाजिक संस्था संघटनांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व. अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान व कै इंदूबाई वाडकर स्मृती प्रतिष्ठिन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीबा महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हडपसरमधील गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना पार्श्वभूमीवर अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दोन दिवस अगोदरच प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले जयंती घरोघरी साजरी करून कुटुंबीयांसमवेत सोशल मीडियावर छायाचित्र टाकावे, अशी स्पर्धा आयोजित केली होती. त्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे मुकेश वाडकर आणि महेंद्र बनकर यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे मयूर फडतरे, रामदास लोखंडे, बाळासाहेब भालसिंग, मुकेश वाडकर, स्नेहा वाडकर उपस्थित होते. दरम्यान, बनकर म्हणाले की, थोर महात्म्यांचे विचार समाजामध्ये रूजविण्याची गरज आहे. त्यांच्या विचारांचे आचरण करून सक्षम विचारांचा समाज घडविण्यात समाधान मानले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

साधना विद्यालयातील शिक्षक अनिल वाव्हळ म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घरामध्ये महात्मा फुले जयंती साजरी केली. मात्र, इतर वेळी सार्वजनिक ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती साजरी करीत मुलांसाठी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांमधून व्यासपीठ मिळवून दिले जाते. बालवयातच मुलांना महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने गोष्टीरूपात महात्मा फुले भाग 1 ते 27 असे व्हीडिओ तयार केले आहेत. मॉडर्न हायस्कूलच्या शिक्षिका तृप्ती वाव्हळ याही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची समाजमाणसात ओळख व्हावी यासाठी ‘व्हयं मी सावित्री बोलतेय ‘ एकपात्री प्रयोग करत असतात. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा शेतकरयाचा आसूड पुस्तक वाचन करून त्याचेही व्हीडिओ आम्ही तयार करत आहोत. महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी तन, मन ,धन अर्पण करून समाजकार्य केले त्यांच्या कार्याचा समाजाला विसर पडू नये आणि समाजमन ढवळून निघावं यासाठी असे छोटे उपक्रम आम्ही राबवत असतो, असे त्यांनी सांगितले.