Pune : सावित्री सन्मान फाउंडेशनतर्फे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सावित्री सन्मान फाउंडेशनने वारंवार पत्र व्यवहार करूनही शाळांवर कारवाई न केल्यामुळे आज (सोमवार, दि. 17 मे) पालकांनी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनामध्ये 70 हून अधिक पालक सहभागी झाले होते. यावेळी टिळेकर यांनी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर दोषी शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सावित्री सन्मान फाउंडेशनच्या सचिव सोनल कोद्रे यांनी सांगितले.

कोद्रे म्हणाल्या की, “शाळेची फी” या कारणामुळे ज्यामध्ये मुलांची काही चूक नाही, अशा कारणामुळे ऑनलाइन शिक्षण थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. आरटीई 2009 मधील कलम 16 व 17 मधील तरतुदीनुसार मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. ज्या मुलांना ट्रान्सफर सर्टिफिकेट देऊन शिक्षण थांबवले आहे, त्यांचे रीतसर प्रवेश करून घ्यावे. “जेवढा खर्च तेवढीच फी” हे धोरण प्रत्येक शाळेने अंगिकारावे. ऑनलाइन शिक्षण पद्धती व यासंबंधीची नियमावली अथवा मार्गदर्शिका शासनाने शाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ जाहीर करावी. ज्या शाळांनी कायद्याचा भंग करून मुलांचे शिक्षण थांबविले आहे. त्या शाळांचे मागील 3 वर्षाचे फायनान्सियल ऑडिट करून दोषी शाळा व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत. ईपीटीए (पालक शिक्षक कार्यकारी संघ) ने शाळांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहून व कागदपत्रांची पडताळणी करून फी ठरवावी. पडताळणी न करता फी ठरविली असेल, तर ती त्वरित रद्द करावी, ईपीटीएची ऑनलाईन स्थापना पारदर्शक पद्धतीने व्हावी. त्या संबंधाचे नियमावली शासनाने त्वरित जाहीर करावी. ईपीटीएमध्ये शाळेचे शिक्षक व शाळेशी संलग्न असलेली कोणतीही व्यक्ती पालक प्रतिनिधी म्हणून नसावी. तसे धोरण शासनाने जाहीर करावे. ईपीटीएची निवड करतानाचे व्हीडिओ रेकॉर्डिंग ऑडिओसहित पालकांना उपलब्ध करून द्यावेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीसुद्धा रीतसर सुरु करून शासनाने त्याला योग्य दर्जा देऊ करावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.