Pune : ससून रूग्णालयातील भंगार चोरणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   ससून रूग्णालयाच्या आवारात पडलेले लोखंडी पाइप, जाळी असा भंगार माल चोरणाऱ्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.

उमेश किसन राठोड (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फरहत इनामदार यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रूग्णालयातील नवीन इमारतीच्या परिसरात लोखंडी पाइपचे तुकडे, जाळ्या पडल्या आहेत. येथील काही किरकोळ स्वरुपाची कामे सुरू आहेत. यामुळे इथे साहित्य पडले आहे. त्यात पडलेले पाइप, जाळी असा भंगार माल राठोड घेऊन निघाला होता. इनामदार यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राठोडला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करत आहेत.