Pune : शाळेतील शिपायाची रेस्ट रूममध्ये आत्महत्या, हडपसर परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शाळेच्या शिपायाने आराम रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. शिवलिंग ऊर्फ सागर कोरे (वय ४५, रा. महादेवनगर, मांजरी) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरे हे येथील एस. एम. जोशी विद्यालयात शिपाई होते. शाळेच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. सध्या शाळा बंद आहेत. कोरे यांना ट्रेकिंग करत फिरण्याची आवड होती. दोन दिवसांपूर्वी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाही.

बुधवारी (१ सप्टेंबर) कोरे यांनी शाळेच्या आवारात असलेल्या शिक्षकांच्या आराम खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. सहायक निरीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. त्यांच्यामागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.