‘कम्युनिटी स्प्रेड’चा धोका टाकण्यासाठी पुण्यातील अनेक परिसर सील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढत आहे. शहरात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असल्याने शहरात सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहे. त्यानुसार शहरात संचारबंदी, वाहतूकबंदी, करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून त्याला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे शहरातील काही भाग सील करण्यात आले आहे. शिवाय कोंढवा परिसरातील अनेक भागात संचार बंदी लागू करण्यात आली.

पुण्यात काल एका दिवसामध्ये ८ कोरोना संसर्गित रुग्णांचा मृत्यू झाला. आज पुन्हा मृतांची संख्या ३ ने वाढली असून, पुण्यात आतापर्यंत कोरोना संसर्गित मृतांची संख्या २१ वर पोहचली आहे. तर कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या २०४ वर पोहचली आहे. मृतांमध्ये एक बारामती व उरलेले पुणे महापालिका हद्दीतील आहे. आतपर्यंत पुणे शहरात १६८, पिंपरी-चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ अशी एकूण २०४ कोरोना संसर्गित रुग्णसंख्या नोंदवली आहे.

पुण्याच्या पूर्व परिसरात आणि सिंहगड रोड परिसरात कोरोना संसर्गित सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. त्यामुळे तेथील पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुण्याच्या पूर्व परिसारातील भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन, हे परिसर पूर्ण पणे सील करण्यात आले आहे. या परिसरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेता या परिसरातील वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

तसेच मध्य पुण्याच्या साधारण २० किलोमीटर परिसरात येणारे छोटे रस्ते बंद करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यांवरती वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे व अत्यावश्यक गोष्टींसाठी या रस्त्यावरून वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. महर्षी नगर, मुकुंद नगर, स्वारगेट, घोरपडी, खडक पोलीस स्टेशन, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ, सॅलिसबरी पार्क, या भागात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. परिसर सील केल्यामुळे नागरिकांचीही मोठी अडचण होणार आहे. केवळ औषधांसाठीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.

शहरातील नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शिवाय प्रत्येकाने मास्क लावून किंवा रुमालाने आपले नाक आणि तोंड बांधूनच बाहेर पडावे लागणार आहे. मास्क नसेल तर अटकही होऊ शकते.