Pune : सेवानी खून प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लक्ष्मी रस्त्यावरील शूज व्यापारी चंदन सेवानी यांच्या खूनातील 7 आरोपींवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. परवेझ हनीफ शेख (वय ४२) हा टोळी प्रमुख आहे. त्याने टोळी तयार करून पुणे, सातारा व सांगली परिसरात दहशत निर्माण केली होती. शेख याच्या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यास गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी परवानगी दिली आहे.

आफ्रिदी रौफ खान (वय२३, रा. नाना पेठ), सुनिल नामदेव गायकवाड (वय ४९, रा.शिवनेरीनगर, कोंढवा), अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय २१, रा, सासवड), किरण सुनिल कदम (वय २१, रा. मालगाव, सातारा), प्रतिम रमेश आंबरे (वय ३६, रा. बिबवेवाडी), परवेझ हनीफ शेख (वय ४२, रा. हडपसर) आणि अनिल सुरेश सपकाळ (वय ४८, रा. शुक्रवार पेठ) अशी मोक्काची कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

जानेवारी महिन्यात (दि. 4) आरोपींनी शूज व्यापारी सेवानी यांचे बंडगार्डन परिसरातून खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर त्याचा सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे गोळ्या घालून खून केला होता. याप्रकरणी सातारा व पुणे पोलिसांनी सात जणांस अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून 7 पिस्तूल आणि ५८ काडतुसे असा शस्त्रसाठा देखील जप्त केला होता. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर परवेझ शेख हा टोळीचा प्रमुख आहे. शेख व आंबरे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांची पुणे, सातारा, सांगली परिसरात दहशत असल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी शेख याच्या टोळीवर मोक्का लावण्यास परवानगी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार हे अधिक करत आहेत.