पुणेकरांनो जरा जपूनच, जमावबंदीनंतर आता ‘हे’ 5 निर्णय लागू, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात आणि खास करून महाराष्ट्र राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी शासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरांत कलम १४४ म्हणजे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पुण्यातील कोणत्याही ठिकाणी ४ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच पुण्यातील मॉल्स, गार्डन, शाळा आणि महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.

साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू राहणार आहेत अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी पुण्यातील बाजारपेठा बंद ठेवणार असल्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतलेला आहे.

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले हे मोठे बदल –

१. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील अशा प्रकारे सुरु राहतील.

२. रेल्वे, बस, खाजगी बस आणि मेट्रो अशी सार्वजनिक वाहतूकही ५० टक्के चालू राहतील.

३. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणाऱ्या प्रवाशांना बस मध्ये उभे राहण्यास मनाई करण्यात येणार असून, प्रवासी काही अंतरावर बसतील यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील.

४. दुकानांच्या वेळा ठरवणार- शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

५. साधनसामुग्रीची उपलब्धता- दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहे.