Pune : मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्च एंडला झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ झाल्याचे दक्षता पथकाच्या पाहाणीतून उघडकीस आल्यानंतर एक झोनल उपायुक्त, क्षेत्रिय कार्यालयाचे दोन सहाय्यक आयुक्त, तीन कार्यकारी अभियंत्यांसह ११ कनिष्ठ अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, हे आदेश दिल्यानंतर यापैकी तीन वरिष्ठ अधिकारी ‘कोरोना’च्या ड्युटीवर असल्याने पाच दिवसांनंतरही अद्याप त्यांना नोटीस दिली नसल्याचे समोर आल्याने ‘कनिष्ठांनी’ देखिल यातून सुटका करून घेण्यासाठी ‘चुळबुळ’ करायला सुरूवात केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

दरवर्षी मार्च अखेरिस होणार्‍या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर गोलमाल होत असल्याच्या अनेक तक्रारी येतात. कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत मार्च अखेरिस होणार्‍या विकास कामांचे ऑडीट करण्यासाठी ‘दक्षता पथक’ स्थापन केले. तत्पुर्वी १९ मार्चपर्यंत वर्कऑर्डर आणि २५ मार्चपर्यंत कामांची बिले सादर करण्याचे आदेश दिले. दक्षता पथकाच्या पाहाणीमध्ये अनेक कामे २५ मार्चनंतरही सुरू असल्याचे मात्र त्या कामांच्या फाईल्स बिलांसाठी दाखल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. कामांची गुणवत्ता तपासणीसाठी नेमलेल्या थर्डपार्टी ऑडीटरने कामांच्या ठिकाणची पाहाणी न करताच बिलांवर स्वाक्षर्‍या केल्याचे तसेच अनेक कामांबाबत उपायुक्त, क्षेत्रिय अधिकारी यांनाच काय तर कनिष्ठ अभियंत्यांनाही काहीच माहिती नसल्याचे पाहाणीत आढळून आले.

अनेक ठिकाणचा कामाचा दर्जा सुमार तर काही कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा अहवाल दक्षता समितीने दिला आहे. या अहवालावरून महापालिका आयुक्तांनी एका झोनल उपायुक्तासह, दोन क्षेत्रिय अधिकारी व १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याची कुणकुण लागताच तीन वरिष्ठ अधिकार्‍यांनी दबावासाठी हातपाय हलविण्यास सुरूवात केली असून ‘कोरोना’ ड्युटीवर असल्याचे खुलासे द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे अद्याप त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. आयुक्तांच्या आदेशानंतरही अद्याप वरिष्ठांना नोटीस बजावली नसल्याचे समजल्यानंतर उर्वरीत अभियंत्यांनीही यातून सुटका करून घेण्यासाठी चुळबुण करायला सुरूवात केली आहे.

दर्जाहिन विकासकामे आणि उधळपट्टीबाबत एवढ्या मोठ्याप्रमाणावर त्रुटी लक्षात आल्यानंतर विरोधी पक्ष शिवसेनेने व कॉंग्रेसच्या एका माजी नगरसेवकांने महापालिका आयुक्तांकडे यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, महापालिकेतील कॉंग्रेस पदाधिकरी आणि सत्ताधारी भाजपने या प्रकरणावर अद्याप कुठलिच भुमिका स्पष्ट केलेली नाही. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीतही यावर एक शब्दाने चर्चा झाली नाही. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले आजच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली नाही. पुढील बैठकीमध्ये यासंदर्भातील आढावा घेण्यात येईल.