‘कोरोना’ची लस येण्यास लागणार 6 महिने, पुण्यातील ‘विषाणू’ तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या ‘टिप्स’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगातील देशांमध्ये झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषणूविरोधातील लस विकसीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी कोरोना लसीचं ह्युमन ट्राययलही सुरु झालं आहे. कोरोनाचा नाश करणारी ही लस येणार कधी, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जगभरातील प्रत्येक नागरिक कोरोनाच्या लसीची प्रतिक्षा करत आहेत. मात्र, किमान सहा महिने तरी कोरोना व्हायरसची लस येणार नाही, त्यामुळे कोरोना व्हायरससह जगायला शिकायला हवं, असं पुण्यातील विषाणू तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी सांगितले की, जगभरात कुठेही कोरोनाची लस यायला आणखी किमान सहा महिने लागणार आहेत. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते.

अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने सीरम इन्स्टिट्युटनेही कोरोना व्हायरसवरील लस विकसित केली आहे.डॉ. राजीव ढेरे म्हणाले की, कोरोना व्हायरसवरील लसीबाबत जगभरात आधी संशोधन आणि मग परीक्षण अशा दोन टप्प्यात काम सुरु आहे. अशी लस तयार करताना परिणामकारकता निश्चित करण्यासाठी ठरलेला कालावधी जाऊनच द्याव लागतो.

तोपर्यंत काय ?
कोरोना व्हायरसवरील लस येईपर्यंत काय कराचे याबाबत डॉ. ढेरे यांनी सांगितले की, पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोनाविरुद्धचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचे सुनिश्चित करा. शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉ. ढेरे यांनी दिला आहे.