Pune : फितूर झालेल्या साथीदारांवर गुन्हा दाखल करा – सत्र न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाठलाग केला म्हणून एका तरुणाविरोधात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे प्रकरण जेव्हा न्यायालयात केले तेव्हा मुलगी व तिच्या वडिलांनी खोटी साक्ष दिली. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. म्हणून न्यायालयात साक्ष देताना फितूर झालेल्या मुलीसह तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अतिरीत्र सत्र न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी हा आदेश दिला. दोघांविरोधात कलम १९१ (खोटी साक्ष देणे व खोटा पुरावा देणे) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयातील नाझर यांना दिले आहेत. त्यामुळे खोटी साक्ष देणे संबंधित मुलगी आणि तिच्या वडिलांच्या अंगलट आले आहे. तर मुलीचा पाठलाग करणारा आरोपी मात्र निर्दोष सुटला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की,

शिरूर तालुक्यातील १७ वर्षीय तरुणी ही कॉलेज जात. त्यावेळी आरोपीची तिचा पाठलाग करीत ‘तू मला आवडते’ असे म्हणाला होता. तसेच एक दिवस त्याने तिला मिठी मारली होती. मात्र मुलीने त्याला सांगितले की ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे मला त्रास देऊ नको’. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने मुलगी आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोन वर्ष हा प्रकार सुरू होता. त्यानंतरही मुलाचा त्रास सुरू असल्याने ६ मे २०१७ रोजी मुलीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस तपास व जबाबामुळे झाले पितळ उघडे –

या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यात मुलीची आणि तिच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची होती. मात्र दोघेही फितूर झाले व त्यांची न्यायालयात खोटी साक्ष दिली. आरोपीने माझा पाठलाग केलाच नाही, असे मुलीने न्यायालयात सांगितले. त्यामुळे पुराव्याअभावी आरोपीची सुटका करण्यात आली. मात्र पोलिसांनी केलेला तपास आणि मुलीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर दिलेला जबाब यावरून तीने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.