शरद पवारांनी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला केली ‘ही’ मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र केसरी कुस्तीतील यंदाचा विजेता हर्षवर्धन सदगीर याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल बारा लाखांचा धनादेश देऊ केला आहे. पावले यांच्या विद्या प्रतिष्ठान बारामती या ट्रस्टतर्फे ही मदत करण्यात आली आहे.

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये हर्षवर्धन सदगीर याने मानाची चांदीची गदा आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. विजयी झाल्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी आणि त्याच्याच तालमीचा पहिलवार योगेश शेळके याला खांद्यावर उचलून घेत खिलाडूवृत्ती दाखवली. मात्र, आज त्याचे प्रशिक्षक काका पवार यांनी स्पर्धेत विजेतेपद मिळालेल्या मल्लास केवळ वीस हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले.

हर्षवर्धन हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गरीब कुटुंबातील आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढून त्याने हा किताब पटकावला आहे. अशावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. पवार यांनी हेच लक्षात घेऊन त्याच्या पुढील एक वर्षासाठी विश्वस्त विठ्ठल मणियार, माजी महापौर अंकुश काकडे यांच्यहस्ते हर्षवर्धन याला बारा लाखांचा धनादेश सुपूर्त केला.

यापूर्वी अभिजीत कटके, राहुल आवारे, उत्कर्ष काळे, किरण भगत यांना मदत केल्याचे मणियार यांनी सांगितले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्यावेळी पवार यांना लक्ष करत समोर कोणी पहिलवान नसल्याची टीका केली होती. यावर पवार यांनी मी कुस्तीच नव्हे तर क्रिकेट, कबड्डीचाही अध्यक्ष असल्याचे सांगितले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/