‘बेटी बचाओ’साठी शरद पवारांची धडपड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शरद पवार हे ‘बेटी बचाओ’ मोहिमेचे उदाहरण आहेत. स्वतःच्या मुलीला पराभवापासून वाचविण्यासाठी ते धडपड करत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला. बारामती मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कॅप्टन शरद पवार यांनी पराभवाची चाहूल लागताच मढ्याच्या मैदानातून पळ काढला. पराभवाच्या भीतीतूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा कार्यकर्त्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीतील राजकीय वातावरण व हवेची दिशा ओळखूनच पंतप्रधान मोदींवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सरकारचे बेटी बचाओ मोहिमेचे उदाहरण आहेत. स्वतःच्या मुलीला, सुप्रिया सुळे यांना पराभवापासून वाचविण्यासाठी ते धडपडत आहेत.’

बारामती हा पवार कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ आहे. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिय सुळे रिंगणात आहेत. या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात भाजपने रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीची जागा खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. त्यासाठी भाजपने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा बारामती मतदार संघात आयोजित केलेल्या आहेत.