शिरूर नगर परिषदेतील लिपीक 42 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर नगर परिषदेमधील लिपीकाला 42 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आज ही कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रकांत रंगनाथ पठारे (वय 47) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यातील 48 वर्षीय तक्रारदार यांचेकडे शिरुर नगर परिषद मध्ये लेबल पुरविण्याचे काम होते. या कामाचे फेब्रुवारी 2020 चे बिल रक्कम 2 लाख 7 हजार रुपये तक्रारदार यांना प्राप्त झाले होते. त्या बदल्यामध्ये मोबदला म्हणून लोकसेवक पठारे यांनी तक्रारदार यांच्याकडे 42 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळी लोकसेवक 42 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.