भाजपसह नेत्यांवर फसवणूकीचा FIR दाखल करा : शिवसेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १२ मार्चला राज्य विधीमंडळाच्या सभागृहात वक्तव्य केले होते की, ‘भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली.’ त्यांच्या या वक्तव्याच्या आधारे शिवसेनेनं भाजपा आणि पक्षाच्या नेत्यांवर विश्वासघात, फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलं आहे.

मुनगंटीवारांच्या या विधानाला विधिमंडळातील सर्व सदस्यांनी ऐकले आणि हे भाषण सभागृहाच्या पटलावर ध्वनिमुद्रित देखील झाले असे शिवसेनेनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान भाजपाच्या नेत्यांनीही हे जाहीरपणे कबुल केलं की भाजपानं शिवसेनेची फसवणूक केल्याचं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे. शिवसेनेनं केलेल्या फसवणुकीच्या आरोपांना या वक्तव्यानं दुजोरा मिळाला आहे असे शिवसेनेनं स्पष्ट केलं.

दरम्यान शिवसेनेनं स्पष्ट केलं की भाजपच्या नेत्यांनी आजपर्यंत ‘आम्ही असं कधीच बोललो नव्हतो’ असं म्हणत आमची बदनामीच केली आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या या वक्तव्याच्या आधारे भाजपा आणि संबंधित नेत्यांवर विश्वासघात, फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेनं पोलीस आयुक्तांकडे केली आहे.